कोपरगावचा विकास रखडवणारा ‘कोल्हे’ अहंकार; ४० वर्षांच्या अपयशाचे खापर ‘बाहेरील शक्तीं’वर फोडून विवेक कोल्हेंची निवडणुकीत पळवाट!

development of Kopargaon

Development of Kopargaon कोपरगाव: कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते विवेक कोल्हे यांनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे केवळ निराशेपोटी ओकलेली विषारी टीका ठरत आहे. ज्येष्ठ नेते काकासाहेब कोयते यांच्या उमेदवारीमुळे कोल्हे गटाच्या पायाखालची वाळू घसरली असून, आता ‘बाहेरील शक्ती’ आणि ‘पार्सल’ अशा शब्दांचा वापर करून कोल्हे कोपरगावकरांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे चित्र समोर आले आहे.

ज्येष्ठांचा सन्मान विसरले; कोल्हेंची ७६ वर्षीय काका कोयटेंवर हीन टीका
विवेक कोल्हे यांनी ७६ वर्षीय काकासाहेब कोयते यांच्या वयाचा आणि प्रकृतीचा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली. “काकांचे वय ७६ आहे, त्यांना मधुमेह आहे, ते इन्सुलिन घेतात,” अशा प्रकारे एखाद्या ज्येष्ठ नेत्याच्या आजारपणाचे भांडवल करणे हे कोपरगावच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारे आहे. सत्तेच्या हव्यासापोटी विवेक कोल्हे इतक्या खालच्या पातळीवर उतरतील, अशी अपेक्षा कोपरगावकरांना नव्हती. अनुभवाच्या जोरावर शहर घडवू पाहणाऱ्या ज्येष्ठांचा असा अपमान करणे हा सुज्ञ मतदारांचा अवमान आहे.

‘बाहेरील शक्ती’चा बागुलबुवा; स्वतःच्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर?
विवेक कोल्हे वारंवार कोपरगावच्या राजकारणात ‘बाहेरील शक्ती’ किंवा ‘शेजारचा तालुका’ यांचा हस्तक्षेप असल्याचे सांगत आहेत. मात्र, कोपरगावची जनता प्रश्न विचारत आहे की, गेल्या ४० वर्षात कोल्हे परिवाराने कोपरगावला विकासाच्या बाबतीत स्वयंपूर्ण का केले नाही? जेव्हा जेव्हा कोल्हे गटाला पराभवाची भीती वाटते, तेव्हा तेव्हा ते अशा प्रकारे प्रादेशिक वादाचा आणि ‘बाहेरील शक्तीं’चा बागुलबुवा उभा करतात. आशुतोष काळे यांनी केलेल्या कामामुळे कोल्हे गटाची सत्ता संकटात आल्यानेच अशा फालतू आरोपांचा आधार घेतला जात आहे.

‘आका’ आणि ‘काका’चा बंदोबस्त करण्याच्या वल्गना; सत्तेचा माज की भीती?
पत्रकार परिषदेत विवेक कोल्हे यांनी “आका आणि काका दोघांचा बंदोबस्त कोपरगावकर करतील” अशी फटकेबाजी केली. मात्र, ही फटकेबाजी नसून कोल्हे यांचा सत्तेचा माज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ज्यांनी ४० वर्षे कोपरगावला खड्ड्यात घातले, तेच आता ‘परिवर्तन’ आणि ‘विद्युतीकरण’च्या गप्पा मारत आहेत. काका कोयते हे कोपरगावच्या मातीतील नेतृत्व असून, त्यांना ‘बाहेरून लादलेले पार्सल’ म्हणणे हे कोल्हे यांचे अज्ञान दर्शवते.

‘युवा पॅनल’च्या नावाखाली जुन्याच भ्रष्टाचाराचा चेहरा?
विवेक कोल्हे यांनी १६ नवीन चेहरे दिल्याचे सांगितले, मात्र हे सर्व चेहरे केवळ कोल्हे परिवाराचे ‘रबर स्टँप’ म्हणून काम करणार असल्याची चर्चा आहे. काका कोयते यांनी कोल्हे गटाची साथ सोडली कारण त्यांना तिथे केवळ ‘मान डोलवणारे’ कार्यकर्ते हवे होते. काकांनी कोपरगावच्या हितासाठी घेतलेला निर्णय कोल्हेंना ‘गद्दारी’ वाटत असेल, तर तो त्यांचा वैयक्तिक दृष्टिकोन आहे; कोपरगावकरांना मात्र हा ‘स्वातंत्र्याचा’ निर्णय वाटत आहे.

कोपरगावकर कोल्हेंच्या ‘भूलथापां’ना बळी पडणार नाही!
४० वर्षांच्या सत्तेचा माज उतरवण्याची वेळ आता आली आहे. आशुतोष काळेंनी आणलेला विकास आणि काका कोयते यांचा दांडगा अनुभव यांच्यासमोर विवेक कोल्हेंची ही ‘टीकात्मक’ पत्रकार परिषद पूर्णपणे निष्प्रभ ठरली आहे. कोपरगावची जनता आता अशा ‘दिशाभूल’ करणाऱ्या नेत्याला घरी बसवण्याच्या तयारीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!