कोपरगाव: कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल पार पडलेली चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा म्हणजे केवळ आश्वासनांची जुनीच पोतडी पुन्हा एकदा रिकामी करण्याचा प्रकार ठरला आहे. या सभेत बावनकुळेंनी ‘तुकडेबंदी’ आणि ‘रजिस्ट्री’च्या नव्या घोषणा केल्या खऱ्या, मात्र कोपरगावकर विचारत आहेत की, काही वर्षांपूर्वी दिलेली ‘भूमिगत वीज’ (Underground Electricity) प्रकल्पाची घोषणा कुठे गेली? कालच्या सभेत या जुन्या अपयशावर मौन बाळगत बावनकुळेंनी पुन्हा एकदा कोपरगावकरांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचे काम केले आहे.
हायलाईट: भूमिगत विजेचा पत्ता नाही, मग नव्या आश्वासनांवर विश्वास कसा ठेवायचा?
चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वी कोपरगाव शहरासाठी भूमिगत वीज वाहिनी प्रकल्प राबवण्याची मोठी घोषणा केली होती. शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि सौंदर्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा होता. मात्र, वर्षानुवर्षे उलटूनही या प्रकल्पाची एक वीटही रचली गेली नाही. आजही कोपरगावच्या गल्लीबोळात विजेच्या तारांचे जाळे लटकत असून अपघाताची भीती कायम आहे. ज्या नेत्याला आपले जुने ‘भूमिगत विजे’चे आश्वासन पाळता आले नाही, त्याच्या कालच्या सभेतील ‘तुकडेबंदी’ आणि ‘रजिस्ट्री’च्या वचनावर जनतेने विश्वास का ठेवावा? असा सवाल आता जोर धरत आहे.
४० वर्षांनंतर निवडणुकीच्या तोंडावरच ‘जावई शोध’
कालच्या सभेत बावनकुळे यांनी महसूल मंत्री म्हणून तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याचे आणि वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्याचे आश्वासन दिले. पण प्रश्न असा उभा राहतो की, गेल्या ४० वर्षांपासून कोल्हे कुटुंब सत्तेत असताना आणि बावनकुळे स्वतः मंत्री असताना हा प्रश्न आताच का आठवला? केवळ निवडणुकीत पराभवाचा धक्का बसू नये म्हणून अशा ‘दिखाऊ’ घोषणा करून मतदारांना भुलवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
आश्वासनांची ‘खैरात’, पण अंमलबजावणी शून्य!
कोपरगावच्या ७५ किलोमीटरच्या रस्त्यांवर कधीही न फिरणारे नेते आता निवडणुकीसाठी मोठ्या गप्पा मारत आहेत. कालच्या सभेत बावनकुळे यांनी “पराग संधान यादी द्या, मी काम करतो” असे सांगितले. पण जनतेचा अनुभव सांगतो की, अशा याद्या केवळ मंत्रालयातील कपाटात धूळ खात पडतात. भूमिगत विजेच्या आश्वासनासारखीच या नव्या घोषणांची अवस्था होणार नाही कशावरून? असा संताप सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
कोपरगावचा स्वाभिमान अशा ‘फेकाफेकी’ला थारा देणार का?
निवडणुकीच्या तोंडावर मिळणारे हे ‘स्वस्त’ वचन कोपरगावची तहान भागवू शकणार नाही. आशुतोष काळे यांनी जमिनीवर काम करून पाण्याचा प्रश्न सोडवला, तर बावनकुळे आणि कोल्हे गट केवळ हवेत घोषणा करत आहेत. कालच्या सभेनंतर कोपरगावकरांना हे स्पष्ट झाले आहे की, बावनकुळे यांच्याकडे जुन्या अपूर्ण कामांचे कोणतेही उत्तर नाही, त्यामुळेच ते नव्या भूलथापा देऊन पळवाट काढत आहेत.



